All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Thursday, November 1, 2018

एक सामान्य माणूस

ती सकाळ नसते की …
संध्याकाळ नसते …
मध्यरात्री कुठेतरी मी घरी पोहोचत असतो,

दोन जिवलग घरात …
वाट पाहून झोपेत कुठे तरी…
मी मात्र किचनमध्ये घुटमळत असतो,

घड्याळात काटे मध्यान्हवर तरी …
मी आपला टिव्हीचे चॅनल चाळत…
पचवायला काही वेळ पाळत असतो,

झोपी गेलेले दोन चेहरे…
डोळ्यात साठवून काही…
मी स्वतः ला सावरत असतो,

कुस बदलत उगाच …
झोपण्याचा तो फाजिल प्रयत्न…
झोप लागताच कुठे …
पुन्हा आॅफिसला जायला झगडत असतो. - #हर्षद_कुंभार

#क्षणकाहीवेचलेले #मराठी #कविता
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem

Friday, September 21, 2018

१ वर्ष , ६ रूममेट आणि ५ स्वयंपाकी …

१ वर्ष , ६ रूममेट आणि ५ स्वयंपाकी …

    वर्ष २०१४ एप्रिल महिन्यात पुण्यात आलो तोच हा साल. सुरुवातीला काही दिवस मावशीकडे राहिलो पण जास्त दिवस रमू शकणार नाही हे माझेच मला माहीत होते. मलाही माझी स्वतंत्र बॅचलर लाईफ जगायची होतीच जी तोवर कधी जगलो नव्हतो.

          कंपनीतील माझ्यासोबत जॉईन झालेले अजून २ जण छान मित्र झाले होते त्यांच्या सोबत ही सुरुवात होणार होती. ठरल्याप्रमाणे आम्ही कंपनी जवळ कुठेतरी रूम पाहायला सुरु केले. डांगे चौक मध्ये हवा असलेला आणि नवीन कंस्ट्रक्शन झालेला असा २ BHK फ्लॅट मिळाला.

नवीन फ्लॅट मध्ये सगळेच आम्हाला नवीन संसार सुरु करत असल्यासारखे विकत घ्यावे लागले. त्या दोघांमध्ये तर मी अगदीच नवीन त्यामुळे गादी घेण्यापासून सगळी सुरुवात. आम्ही तिघे तर सेट झालो होतो पण फ्लॅटचे भाडे १२ हजार तिघांत परवडणारे नव्हते मग अजून ३ जण आम्ही शोधत होतो. त्याप्रमाणे आम्ही कंपनी आणि इतर ऑनलाइन साईट्स वर तशी जाहिरात दिली.

रोज पोरांचे फ्लॅट बाबतीत कॉल येऊ लागले होते त्यांना सविस्तर माहीती देत फ्लॅट पाहायला येण्यासाठी तारखा आणि वेळ देत होतो. आम्ही आयटी कंपनी मध्ये होतो म्हणून विद्यार्थी सोडून फक्त जॉब करणारी पोरं आम्हाला हवी होती. आम्ही मुलाखत घेतल्या सारखे बरेच पोरांना पडताळून पाहिले आणि ३ पोर निवडली. १ जण कॉग्निझंट , १ जण इंफ़ोसिस आणि एक जण इंटरशिप करणारा असे आम्ही फायनल केले. ठरल्याप्रमाणे त्यांच्या कडून सुरुवातीच्या सेटअपचे पैसे घेतले, आमचा थोडा भार हलका झाला होता आणि होणार होता.

आमचे ६ जणांचे जेवण कंपनीत होयचे पण ते जास्त दिवस चालले नाही कारण आम्ही कंटाळलो होतो आणि शेवटी मेस लावावी की फ्लॅट वर सोय करावी या निर्णयावर पोचलो. काही दिवस मेस सुद्धा लाऊन पाहिली पण पोरं भारीच शौकीन त्यांना हवे ते खायला मिळत नव्हते. सरते शेवटी मग फ्लॅट वर सोय करू असे ठरले.

फ्लॅटवर सोय करायच्या दृष्टीने आमच्याकडे काहीच नव्हते असे म्हणायला हरकत नव्हती शिवाय काही वस्तू एका कडे होत्या त्यामध्ये १ कुकर, १ टोप/पातेले आणि १ शेगडी. आता पुन्हा संसाराचा अविभाज्य भाग असलेल्या किचनला आम्हाला सजवायचं होते. महत्वाची अशी भांडी आम्ही D-Mart मधून घेतली. राहिला प्रश्न शेगडी आहे पण गॅस सिलेंडर तर लागणार म्हणून विचारपूस केली तर ब्लॅकने घेणे परवडणारे नव्हते. मग एकाच्या नावाने गॅस सिलेंडर घेण्याचं आम्ही ठरवले आणि काँट्रीब्युशन काढून आम्ही तेही केले. महत्त्वाचे असे सर्व झाले होते आता फक्त स्वयंपाकी राहिला.

ज्या सोसायटीमध्ये आम्ही राहत होतो तिथे वॉचमन काकांना आम्ही सांगून ठेवले आणि दुसऱ्या दिवसापासून रोज एक तरी मावशी/काकू विचारायला येऊ लागल्या. त्यातली पहिली स्वयंपाकी आम्हाला लाभली ती वयस्कर मावशी म्हणजे आम्हीच त्यांना फायनल केले जास्त अनुभव असेल या अर्थाने. दुसऱ्या दिवसापासून फ्लॅट वर स्वयंपाक सुरु झाला आमचे १५ दिवसात रुटीन बसले. दर आठवड्याला १६ नंबर बस स्टॉप जवळ आठवडे बाजार भरतो तेव्हा आळी-पाळीने दोघा-दोघांनी बाजार रविवारी भरायचा आणि महिन्याचा किराणा हे पण नक्की केले. प्रत्येक गोष्टीचा हिशेब मांडून ठेवायची सवय होतीच त्यामुळे महिनाअखेरीस मग प्रत्येकाचा हिशेब ही केला जायचा. हे सगळे अगदीच सुरळीत चालू झाले.

गंमत सुरु झाली ती काही दिवसांनी जेव्हा कॉग्निझंट वाला मित्राने मावशींबद्दल तक्रार करायला सुरुवात केली. त्याचे ऑफिस टाइम हे सकाळी ८ ते ५ असे होते त्यामुळे मावशींना सकाळी त्याच्यासाठी लवकर येऊन स्वयंपाक करून जायला लागत असे पण संध्याकाळी तो एकटाच असायचा फ्लॅट वर. त्या मावशींना बोलायची भारीच हौस त्यामुळे त्या मित्राला आपली सगळी घरची दुःखभरी कहाणी ती रोज संध्याकाळी ऐकवायची. बिचारा सुरुवातीला नवीन म्हणून सर्व ऐकायचा. २ महिन्यात तो इतका बोर झाला की विचारू नका दुसरी स्वयंपाकी बघू म्हणून बोलू लागला. मग काय झाला पुन्हा शोध सुरु …

काही दिवसांनी दुसरी स्वयंपाकी मावशी मिळाली आणि तिचेही रुटीन चालू झाले पण काही दिवसात हे लक्षात की ही नवीन मावशी भाजीमध्ये तेल खूप वापरते त्यामुळे ते आम्हाला आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या परवडणारे नव्हते. त्या मावशी बद्दल जरा संशय देखील येऊ लागला होता की तिने आम्हाला तिचे नाव खोटे सांगितले आहे आणि तिचे पान खाणे हे आपण आम्हाला खटकत होते.

याच दरम्यान आम्हाला आमचे स्वतः चे कपडे धुवून आणि फ्लॅटची साफ सफाई करून कंटाळा आला म्हणून आम्हाला कपडे धुवायला आणि फरशी पुसायला म्हणून अजून एक मावशी मिळाली ती फक्त तेव्हडेच काम करायची असे नाही पण इतर बायकांच्या गोष्टी सांगत असायची. तिच्या सांगण्यावरून आम्हाला असे कळले की दुसरी मावशीने आम्हाला खोटी माहीती दिली आहे. म्हणून हिला पण आम्ही काढून टाकली आणि नवीन मावशीचा शोध पुन्हा सुरु …

फरशी पुसणाऱ्या मावशीने तिच्या ओळखीच्या एका मावशीला आणले आणि ही आमची ३ री मावशी स्वयंपाकी होती. हीचे रुटीन बसता बसता एक गोष्ट कळली की ही नवीन तिसरी मावशी भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट खूप वापरते आणि जवळ जवळ सगळ्याच भाजीमध्ये वापरते. आता पोरांना अश्या भाजीची सवय नसल्याने ते भाजी घेऊन जायला टाळू लागले. शेवटी फरशी पुसणाऱ्या मावशींना सांगून तिलाही काढून टाकले. तसा तिला थोडा रागही आला कारण ती तिची मैत्रीण असल्यासारखं दोघी एकाच वेळी यायच्या आणि गप्पा मारत काम चालू असायचे. आणि ते बंद होणार होते.

आता आम्ही विचार केला की आपणच पाहू एखादी चांगली. तेव्हा आमच्या कंपनीतील एक मैत्रीण आमच्या सोसायटी मध्ये राहत होती तिने तिच्या घरी काम करणारी मावशी सुचवली. आता ही ४ थी मावशी आमच्याकडे येणार होती. तिचेही रुटीन सुरु झाले पण कालांतराने तिने चपाती बनवण्यात गडबड करायला सुरुवात केली. तिच्या चपात्या इतक्या कडक होत होत्या की दुपारीच त्या चावायचं म्हणले तरी जमत नव्हते. त्याबद्दल एक मताने आम्ही त्या मावशींना सांगितले तर ती म्हणाली की हे विकतचे पीठ असेच असते त्यामुळे चपात्या बिघडत आहेत. तुम्ही दळून
आणा पीठ. तिच्यासाठी आम्ही ते पण उपद्व्याप केले पण परिस्तिथी काही बदलली नाही. शेवटी मावशीच बदलली.

पुन्हा शोध सुरु ….

    शेवटी आम्ही पण सतत मावशी बदलून कंटाळून गेलो होतो आणि फरशी पुसणाऱ्या मावशींना विचारले की तुम्हीच करता का. सुरुवातीला ती नाहीच म्हणत होती कारण तिला बाहेर पण कामे आहेत जमणार नाही वेळे अभावी. आमचा शोध सुरूच होता त्यात आमच्या वर दया येऊन कधी कधी या मावशी आम्हाला नास्ता बनवून देयच्या. खूप विनवण्या करून करून शेवटी त्या मावशीने एक काम सोडून आमच्याकडे सुरु केले आणि आमच्या लिस्ट मध्ये ५ व्या स्थानी विराजमान झाल्या. आमचा आनंद गगनात मावेना असेच झाले होते. सगळे आलबेल चालू होते आणि वर्ष ही संपत आले होते त्यामुळे मावशीने तिचे पैसे वाढवून मागीतले होते. आम्ही पण इतक्या दिवसाची ओळख म्हणून मस्करी मध्ये करू करू बोलून काही दिवस घालवले. तिला वाटले पोर सिरियसली घेत नाहीये म्हणून तिने वेगळाच मार्ग निवडला आणि आम्हाला घाबरावयाला सुरू केले बोलता बोलता तिच्या पोरांबद्दल सांगू लागली की तिची मुले किती रागीट आहेत एक तर जेल मध्ये पण जाऊन आला आहे इत्यादी. ..

नाईलाजाने आम्हाला पैसे वाढवले लागले आणि मावशीला वाटले पोरं आता आपल्याला दबकून राहतील. ती कधीपण दांडी मारायला लागली तिच्या मर्जीने सर्व चालू लागले. आमचे स्वातंत्र्य गेल्यासारखे वाटल्याने आम्हाला निर्णय घेणे भाग होते. त्यात आमचे घरभाडे ही वाढले सगळं हिशेब बिघडू लागला. प्रत्येकाला जास्त खर्च होत आहे असे दिसू लागले आणि या मावशीला पण काढायचा निर्णय झाला. आणि आता बास म्हणून पुन्हा बाई नकोच बाबा म्हणून सगळे वैतागले. हळू हळू एक एक जण फ्लॅट पण सोडू लागला सुरुवात माझ्यापासून झाली कारण माझं लग्न झाले मे २०१५ मध्ये नंतर एक एक जण निघून गेला.

तो एक वर्षांचा अनुभव खूप काही देऊन गेला. - हर्षद कुंभार (२१/०९/२०१८)      

#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi

Sunday, July 15, 2018

विचारांची वीज



वीज म्हंटले की काहींना भीती वाटते तर काहींना ती विलक्षण वाटते. ती कधी रौद्र रूपात असते तर कधी सौम्य. आणि एक ही वीज माझ्या मनातली आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचते बऱ्याचदा तर कधी मनातच राहते.


Saturday, May 26, 2018

पक्षी मी थव्यातला ...




या कवितेचा संदर्भ किती लोकांना लागेल मला कल्पना नाही पण आज एका ठिकाणी इंटरव्यूसाठी गेलो होतो तेव्हा त्या वातावरणातील जाणवलेला भाव अलगद  असा उमटला.

पक्ष्यांच्या त्या थव्यात …
ढंग माझा वेगळा,
नव्याचा साज अंगी…  
पण जरासा घाबरलेला.

गप्प विसावतो त्याच झाडावर…
एकटा मी कोपर्‍यात फांदीवर,
किलकिलाट थव्यात सार्‍या…
पण मी माझा स्वर शोधतो.

एक दिवस माझीही असेल …
झेपही तीच, घिरटीही तीच ,
त्याच हवेतला, वाऱ्यावर उडणारा…
मी ही होईल त्या थव्यातला.  - हर्षद कुंभार (२६/०५/२०१८ १२:१५ दुपारी)

#KshanKahiWechlele #harshadkumbhar #marathi #poem #feeling
#क्षणकाहीवेचलेले #हर्षदकुंभार #मराठी #कविता #भावना   



Thursday, May 24, 2018

आयुष्य असावे असे





---------------- आयुष्य काय असावे ---------------

झेप घ्यावी अशी …
स्वप्नांच्या पलीकडे,
वास्तव दिसेल जिथे ...
डोळ्यांच्या पुढे.  

मार्ग एक निवडावा …
अवघड जरा ,
लागून कस इच्छांचा  …
निर्णय होईल खरा.

सिध्द करावे स्वतः ला…
ध्येय काही आखून,
आयुष्य काय असावे …
द्यावे जगाला दाखवून.  - हर्षद कुंभार (२४/०५/२०१८ रात्रौ १०:१०)

#KshanKahiWechlele #harshadkumbhar #poem #poerty
#मराठी #कविता






Sunday, May 13, 2018

९ महिने ९ दिवस

-------------    ९ महिने ९ दिवस -----------

५ महिन्यापुर्वी मी ही कविता लिहायला सुरुवात केली होती ती आज पुर्ण झाली😌. पार कन्यारत्न झाल्यावर 🙄… अगाध महिमा या मनाचा कधी धो धो पाऊस, तर कधी कोरडेच वारे 😬

चाहूल लागताच तुझी…
सुख ओंझळीत साचले ,
स्वप्नांची उंची भली …
मज आभाळ ठेंगणे झाले.

तू आणि फक्त तू  …
सर्व भिंती भास तुझे,
हरवून बसते जग …
तुझे माझ्यातील बागडणे.

उमजेल ना बाळा …
माझे लाडे लाडे बोलणे?
की एकटीचेच होईल…
माझे मुक्त बडबडणे!

चातक मी झाले…
आतुरता गगनात मावेना,
दिवस गुंततो असा की …
आठवड्याचे गणित कळेना.

नाना हट्ट तुझे पुरवता…
बाबांची उडते दैना,
हवं नको ते विचारत …
आणतात डोहाळ्यांचा खजिना.

असे असेल, तसे असेल…
सार्‍या तुझ्या कल्पना,
रंगवून चित्र कितीही …
आमचे मन तृप्त होईना.

९ महिने ९ दिवस…
हे फक्त जगासाठीच झाले,
तुझे अन आमचे नाते तर …
पहिल्या दिवशी रुजले. - हर्षद कुंभार (१३-०५-२०१८ ८.०० संध्याकाळी)

#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #मराठी #कविता

Saturday, May 5, 2018

लिहावे काही...

लिहावे काही…
म्हणुन विचार घेवून बसलो,
उतरतील शब्द…
म्हणुन मन अंथरून बसलो.

जमतील नभ…
म्हणुन ओंजळ करून बसलो,
घेऊन शब्दांचा पसारा…
आज कविता करायला बसलो. - हर्षद कुंभार (०५-०५-२०१८ ९:५६ सकाळ)

#KshanKahiWechalele #harshadkumbhar #मराठी #कविता #poem 

Friday, May 4, 2018

ऋतू भाग १

----------------- ऋतू भाग -----------------

नेहमी प्रमाणे सुट्टीच्या दिवशी आरामात दिवसाची सुरुवात करणारे आम्ही. आज दोघांना सुट्टी होती तरी न जाणे का मलाच जाग आली होती तरी अंजलीला मी म्हणालो होतो उद्या निवांत उठव म्हणून.

मी फ्रेश झालो आणि लॅपटॉप घेऊन बाल्कनीत जाऊन बसलो. अंजली डोळे चोळतच

“आज लवकर उठलास”

“हां अग आठवडाभर खुप काही सुचत होते म्हणुन आज तयारीत बसलो आहे.”

“अरे व्वा छान ”

“बरे ऐक ना मस्त चहा ठेवतेस का”

“आलेच ”

सकाळच्या शांततेत फक्त पक्षांच्या किलकिलिटाशिवाय इतर आवाज नव्हता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ह्या गोष्टींना मुकतो आपण. विचारांची गाडी सुसाट वेग घेणारच इतक्यात अंजली चहा घेऊन आली.

अंजली चहाचा कप मला देत

“तरी किती सांगत असते लिहीत जा” अंजली चहाचा घोट घेत.

“हो अग इतर वेळी अॉफिसला असताना अगदी प्रतिकूल परिस्थितीत अचानक काही सुचत असते पण ते लिहिने शक्य होत नाही. सुचलेल्या भावना या कळी सारख्या असतात त्या मांडताना पुर्ण उमलु देऊ लागतात नाही तर एक एक पाकळी निसटून जाते.” मी आपल्याच तंद्रीत बोलत होतो.

“चहा झाला का?” या प्रश्नामुळे माझी तंद्री गेली

“नाही झाला अग जा तू मी आणतो कप ” मी लॅपटॉप बाजूला ठेवला आणि समोरच्या टी पोय वर पाय ठेउन चहा प्यायला लागलो. कुठे होतो आणि कुठे पोहोचलो काही कळले नाही.

“लवकर पी थंड होईल नाहीतर.” म्हणत ती किचनमध्ये निघून गेली.

कोणतीच भावना आपण जबरदस्तीने अनुभवू शकत नाही ती नैसर्गिकरीत्या येयला हवी हा साधा नियम लेखनात लागु पडतो.

“अरे झाला का चहा पिऊन ” अंजली किचनमधून विचारत होती. - हर्षद कुंभार (०४-०५-२०१८ १२:४८ भरदुपारी )

क्रमशः….

Monday, April 9, 2018

भावना...

टिमटिमत्या लाखों,
भावनांमध्ये एकटा चंद्र मी …
परिक्रमा रोजची मस्तकी,
पण कवडसा पाडतात काही.

न्याय द्यावा कोणास,
सार्‍या माझ्याच भावना…
सुख ही माझे अन दुःख ही,
तरी ऊन्ह - पावसाचा खेळ काही.

सुकाळ कधी, कधी दुष्काळ,
भावनांचा कल्लोळ सारा…
म्हणले विसावु क्षणभर सर बनुन,
पण अकस्मात वीज चमकतात काही.

हसुन सुख संपवावे, रडून दुखः,
जस की आभाळ मोकळे करावे…
पण उद्याही परिस्थितीचा सुर्य उगवेल,
म्हणून आशा मावळतात काही.

खरे जगणे त्यालाची जमले,
राखुनी समतोल या मोसमांचा…
वृक्ष बनुनी दोन हात केले,
तव कठीण काळ आठवावे काही. - हर्षद कुंभार (०९-०४-२०१८ ३.५२)

#KshanKahiWechalele #harshadkumbhar

Wednesday, March 7, 2018

८ मार्च २०१८ महिला दिन

स्त्री जन्मा तुझी कहाणी…..

आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. दरवर्षी मी ८ मार्चला एक तरी कविता स्त्री जातीला समर्पित करतो. पण या वर्षी मी अनुभवलेल्या भावनांचा उद्रेक मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही कडव्यात सीमित करून तोकड्या शब्दांत मांडणे अयोग्य ठरले असते. यावेळी भरभरून लिहावे म्हणून हा लेख कारण त्याशिवाय भावनांना न्याय मिळाला नसता.

       स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजेच मातृत्व आणि असे म्हणतात मातृत्व आल्याशिवाय स्त्रीला पुर्णत्व नाही. मातृत्व म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच असतो स्त्रीचा. हे आपण वाचुन नाहीतर ऐकुन आहे. या सगळ्या गोष्टींचा माझा संबंध थेट आला तो पत्नीच्या मातृत्वाच्या निमित्ताने.

    २ मार्च रोजी सकाळी सासूबाईंचा फोन आला की पत्नीला दवाखान्यात दाखल केले आहे. मुळ तारीख होती १६ मार्च त्यामुळे असे अचानकपणे कळले तेव्हा तातडीने मी दवाखाना गाठला सुदैवाने मी गावीच होतो. तिथे गेलो तेव्हा पत्नी दवाखान्यातील आवारात फेर्‍या मारत होती. डॉक्टरांनी तिला प्रसववेदना याव्यात म्हणून हे सांगीतले होते. तसे तिला पहाटे ३ पासून वेदना जाणवत होत्या आणि डॉक्टरांनी तपासणी करून आजच प्रसूती होईल हे निश्चित सांगितले पण मुख्य कळ येण्यासाठी तिला फेर्‍या मारणे आवश्यक होते. तेव्हा सकाळी ९ पासून ते अगदी दुपारी १२.३० पर्यंत मी पत्नीला या फेर्‍या मारण्यासाठी साथ दिली. दरम्यानच्या काळात दर १५ ते २० मिनिटांनंतर तपासणीसाठी जावे लागायचे. आता इतका वेळ चालून माझेच पाय खुप दुखायला लागले तर पत्नीची काय अवस्था झाली असेल. तिला हे सुसह्य ह्वावे म्हणून मी थट्टा, विनोद करून तिचा हा वेळ मजेशीर घालवत होतो.

        पण इतका वेळ जाऊन देखील कळा हव्या त्या प्रमाणात येत नव्हत्या म्हणून डॉक्टरांनी मग सलाईनच्या आधारे प्रसववेदना यावी यासाठी इंजेक्शन दिले. त्यानंतर प्रसूतीसाठीच्या विशिष्ट पद्धतीच्या बेडवर पत्नीला झोपवले ते पण १२.३० पासून एकाच स्थितीत सलग चार तास तेव्हा कुठे ४.३८ ला आम्हाला आनंदच्या बातमी स्वरूपात कन्यारत्न झालेले कळले तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला आणि दिवसभराचा क्षीण क्षणात लोप पावला. त्या नंतरही पत्नीला बराच वेळ तसेच झोपुन रहायचे होते इतर उपचारासाठी. इतका वेळ आपण झोपेत सुध्दा स्थिर राहु शकत नाही आणि तिला शुद्धित तसे करायचे होते. यातही पत्नीने धैर्याने नैसर्गिक प्रसूतीसाठी मन घट्ट केले होते तिच्या प्रबळ इच्छाशक्ती मुळे ती शक्य झाली. प्रसृत झाल्यावर लगेचच पत्नीने हसतमुखाने डॉक्टरांना आधी बाळ दाखवायला सांगितले. यावर डॉक्टरांनी विशेष गौरवउद्गार केले आणि इतक्या वर्षात प्रथमच अशी स्त्री पाहिली जिणे इतक्या वेदना सहन करुनही हसतमुखाने ही मागणी केली असल्याचे सांगितले. यासाठी त्रिवार सलाम माझ्या पत्नीला तेव्हा स्त्रीला उच्च कोटीचे सामर्थ्य असते हे यावेळी अनुभवले. अजून एक सामर्थ्यवान जीव जन्माला आला याबद्दल अतिशय अभिमान वाटतो आहे.

सरतेशेवटी महिला दिनानिमित्त आणि गोंडस बाळाला जन्म दिला याबद्दलसुध्दा माझ्या पत्नीला मनापासून अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद. तसेच भुतलावरील सर्व स्त्री जातीला माझ्याकडुन महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. - हर्षद कुंभार (०८-०३-२०१८)

Sunday, February 18, 2018

विकासाच्या गोष्टी ….



विकासाच्या गोष्टी ….

काय बोलू त्यांना …
ज्यांच्या ज्ञानाच्या गंगा काल वाहिल्या होत्या,
आजचा दिवस उजाडला तरी…
बदलांसाठी साध्या नाल्यापण रेंगाळल्या.

ऐकुन झाले, वाचुन झाले…
चुकतोय कुठे ठणकावून झाले,
पण मी का? हाच प्रश्न घेऊन…
कितीतरी शपथा अडखळल्या.   

कारण तू ही तोच आहेस,
मीही तोच आहे…
अन कालच्या विकासांच्या गोष्टी,
त्या आज एका रद्दीत विसावल्या. - हर्षद कुंभार (१८-०२-२०१८ १०:१५ रात्रौ )

#KshanKahiWechlele #harshadkumbhar