स्त्री जन्मा तुझी कहाणी…..
आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. दरवर्षी मी ८ मार्चला एक तरी कविता स्त्री जातीला समर्पित करतो. पण या वर्षी मी अनुभवलेल्या भावनांचा उद्रेक मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही कडव्यात सीमित करून तोकड्या शब्दांत मांडणे अयोग्य ठरले असते. यावेळी भरभरून लिहावे म्हणून हा लेख कारण त्याशिवाय भावनांना न्याय मिळाला नसता.
स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजेच मातृत्व आणि असे म्हणतात मातृत्व आल्याशिवाय स्त्रीला पुर्णत्व नाही. मातृत्व म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच असतो स्त्रीचा. हे आपण वाचुन नाहीतर ऐकुन आहे. या सगळ्या गोष्टींचा माझा संबंध थेट आला तो पत्नीच्या मातृत्वाच्या निमित्ताने.
२ मार्च रोजी सकाळी सासूबाईंचा फोन आला की पत्नीला दवाखान्यात दाखल केले आहे. मुळ तारीख होती १६ मार्च त्यामुळे असे अचानकपणे कळले तेव्हा तातडीने मी दवाखाना गाठला सुदैवाने मी गावीच होतो. तिथे गेलो तेव्हा पत्नी दवाखान्यातील आवारात फेर्या मारत होती. डॉक्टरांनी तिला प्रसववेदना याव्यात म्हणून हे सांगीतले होते. तसे तिला पहाटे ३ पासून वेदना जाणवत होत्या आणि डॉक्टरांनी तपासणी करून आजच प्रसूती होईल हे निश्चित सांगितले पण मुख्य कळ येण्यासाठी तिला फेर्या मारणे आवश्यक होते. तेव्हा सकाळी ९ पासून ते अगदी दुपारी १२.३० पर्यंत मी पत्नीला या फेर्या मारण्यासाठी साथ दिली. दरम्यानच्या काळात दर १५ ते २० मिनिटांनंतर तपासणीसाठी जावे लागायचे. आता इतका वेळ चालून माझेच पाय खुप दुखायला लागले तर पत्नीची काय अवस्था झाली असेल. तिला हे सुसह्य ह्वावे म्हणून मी थट्टा, विनोद करून तिचा हा वेळ मजेशीर घालवत होतो.
पण इतका वेळ जाऊन देखील कळा हव्या त्या प्रमाणात येत नव्हत्या म्हणून डॉक्टरांनी मग सलाईनच्या आधारे प्रसववेदना यावी यासाठी इंजेक्शन दिले. त्यानंतर प्रसूतीसाठीच्या विशिष्ट पद्धतीच्या बेडवर पत्नीला झोपवले ते पण १२.३० पासून एकाच स्थितीत सलग चार तास तेव्हा कुठे ४.३८ ला आम्हाला आनंदच्या बातमी स्वरूपात कन्यारत्न झालेले कळले तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला आणि दिवसभराचा क्षीण क्षणात लोप पावला. त्या नंतरही पत्नीला बराच वेळ तसेच झोपुन रहायचे होते इतर उपचारासाठी. इतका वेळ आपण झोपेत सुध्दा स्थिर राहु शकत नाही आणि तिला शुद्धित तसे करायचे होते. यातही पत्नीने धैर्याने नैसर्गिक प्रसूतीसाठी मन घट्ट केले होते तिच्या प्रबळ इच्छाशक्ती मुळे ती शक्य झाली. प्रसृत झाल्यावर लगेचच पत्नीने हसतमुखाने डॉक्टरांना आधी बाळ दाखवायला सांगितले. यावर डॉक्टरांनी विशेष गौरवउद्गार केले आणि इतक्या वर्षात प्रथमच अशी स्त्री पाहिली जिणे इतक्या वेदना सहन करुनही हसतमुखाने ही मागणी केली असल्याचे सांगितले. यासाठी त्रिवार सलाम माझ्या पत्नीला तेव्हा स्त्रीला उच्च कोटीचे सामर्थ्य असते हे यावेळी अनुभवले. अजून एक सामर्थ्यवान जीव जन्माला आला याबद्दल अतिशय अभिमान वाटतो आहे.
सरतेशेवटी महिला दिनानिमित्त आणि गोंडस बाळाला जन्म दिला याबद्दलसुध्दा माझ्या पत्नीला मनापासून अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद. तसेच भुतलावरील सर्व स्त्री जातीला माझ्याकडुन महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. - हर्षद कुंभार (०८-०३-२०१८)
No comments:
Post a Comment