Saturday, May 26, 2018

पक्षी मी थव्यातला ...
या कवितेचा संदर्भ किती लोकांना लागेल मला कल्पना नाही पण आज एका ठिकाणी इंटरव्यूसाठी गेलो होतो तेव्हा त्या वातावरणातील जाणवलेला भाव अलगद  असा उमटला.

पक्ष्यांच्या त्या थव्यात …
ढंग माझा वेगळा,
नव्याचा साज अंगी…  
पण जरासा घाबरलेला.

गप्प विसावतो त्याच झाडावर…
एकटा मी कोपर्‍यात फांदीवर,
किलकिलाट थव्यात सार्‍या…
पण मी माझा स्वर शोधतो.

एक दिवस माझीही असेल …
झेपही तीच, घिरटीही तीच ,
त्याच हवेतला, वाऱ्यावर उडणारा…
मी ही होईल त्या थव्यातला.  - हर्षद कुंभार (२६/०५/२०१८ १२:१५ दुपारी)

#KshanKahiWechlele #harshadkumbhar #marathi #poem #feeling
#क्षणकाहीवेचलेले #हर्षदकुंभार #मराठी #कविता #भावना   Thursday, May 24, 2018

आयुष्य असावे असे

---------------- आयुष्य काय असावे ---------------

झेप घ्यावी अशी …
स्वप्नांच्या पलीकडे,
वास्तव दिसेल जिथे ...
डोळ्यांच्या पुढे.  

मार्ग एक निवडावा …
अवघड जरा ,
लागून कस इच्छांचा  …
निर्णय होईल खरा.

सिध्द करावे स्वतः ला…
ध्येय काही आखून,
आयुष्य काय असावे …
द्यावे जगाला दाखवून.  - हर्षद कुंभार (२४/०५/२०१८ रात्रौ १०:१०)

#KshanKahiWechlele #harshadkumbhar #poem #poerty
#मराठी #कविता


Sunday, May 13, 2018

९ महिने ९ दिवस

-------------    ९ महिने ९ दिवस -----------

५ महिन्यापुर्वी मी ही कविता लिहायला सुरुवात केली होती ती आज पुर्ण झाली😌. पार कन्यारत्न झाल्यावर 🙄… अगाध महिमा या मनाचा कधी धो धो पाऊस, तर कधी कोरडेच वारे 😬

चाहूल लागताच तुझी…
सुख ओंझळीत साचले ,
स्वप्नांची उंची भली …
मज आभाळ ठेंगणे झाले.

तू आणि फक्त तू  …
सर्व भिंती भास तुझे,
हरवून बसते जग …
तुझे माझ्यातील बागडणे.

उमजेल ना बाळा …
माझे लाडे लाडे बोलणे?
की एकटीचेच होईल…
माझे मुक्त बडबडणे!

चातक मी झाले…
आतुरता गगनात मावेना,
दिवस गुंततो असा की …
आठवड्याचे गणित कळेना.

नाना हट्ट तुझे पुरवता…
बाबांची उडते दैना,
हवं नको ते विचारत …
आणतात डोहाळ्यांचा खजिना.

असे असेल, तसे असेल…
सार्‍या तुझ्या कल्पना,
रंगवून चित्र कितीही …
आमचे मन तृप्त होईना.

९ महिने ९ दिवस…
हे फक्त जगासाठीच झाले,
तुझे अन आमचे नाते तर …
पहिल्या दिवशी रुजले. - हर्षद कुंभार (१३-०५-२०१८ ८.०० संध्याकाळी)

#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #मराठी #कविता

Saturday, May 5, 2018

लिहावे काही...

लिहावे काही…
म्हणुन विचार घेवून बसलो,
उतरतील शब्द…
म्हणुन मन अंथरून बसलो.

जमतील नभ…
म्हणुन ओंजळ करून बसलो,
घेऊन शब्दांचा पसारा…
आज कविता करायला बसलो. - हर्षद कुंभार (०५-०५-२०१८ ९:५६ सकाळ)

#KshanKahiWechalele #harshadkumbhar #मराठी #कविता #poem 

Friday, May 4, 2018

ऋतू भाग १

----------------- ऋतू भाग -----------------

नेहमी प्रमाणे सुट्टीच्या दिवशी आरामात दिवसाची सुरुवात करणारे आम्ही. आज दोघांना सुट्टी होती तरी न जाणे का मलाच जाग आली होती तरी अंजलीला मी म्हणालो होतो उद्या निवांत उठव म्हणून.

मी फ्रेश झालो आणि लॅपटॉप घेऊन बाल्कनीत जाऊन बसलो. अंजली डोळे चोळतच

“आज लवकर उठलास”

“हां अग आठवडाभर खुप काही सुचत होते म्हणुन आज तयारीत बसलो आहे.”

“अरे व्वा छान ”

“बरे ऐक ना मस्त चहा ठेवतेस का”

“आलेच ”

सकाळच्या शांततेत फक्त पक्षांच्या किलकिलिटाशिवाय इतर आवाज नव्हता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ह्या गोष्टींना मुकतो आपण. विचारांची गाडी सुसाट वेग घेणारच इतक्यात अंजली चहा घेऊन आली.

अंजली चहाचा कप मला देत

“तरी किती सांगत असते लिहीत जा” अंजली चहाचा घोट घेत.

“हो अग इतर वेळी अॉफिसला असताना अगदी प्रतिकूल परिस्थितीत अचानक काही सुचत असते पण ते लिहिने शक्य होत नाही. सुचलेल्या भावना या कळी सारख्या असतात त्या मांडताना पुर्ण उमलु देऊ लागतात नाही तर एक एक पाकळी निसटून जाते.” मी आपल्याच तंद्रीत बोलत होतो.

“चहा झाला का?” या प्रश्नामुळे माझी तंद्री गेली

“नाही झाला अग जा तू मी आणतो कप ” मी लॅपटॉप बाजूला ठेवला आणि समोरच्या टी पोय वर पाय ठेउन चहा प्यायला लागलो. कुठे होतो आणि कुठे पोहोचलो काही कळले नाही.

“लवकर पी थंड होईल नाहीतर.” म्हणत ती किचनमध्ये निघून गेली.

कोणतीच भावना आपण जबरदस्तीने अनुभवू शकत नाही ती नैसर्गिकरीत्या येयला हवी हा साधा नियम लेखनात लागु पडतो.

“अरे झाला का चहा पिऊन ” अंजली किचनमधून विचारत होती. - हर्षद कुंभार (०४-०५-२०१८ १२:४८ भरदुपारी )

क्रमशः….

Monday, April 9, 2018

भावना...

टिमटिमत्या लाखों,
भावनांमध्ये एकटा चंद्र मी …
परिक्रमा रोजची मस्तकी,
पण कवडसा पाडतात काही.

न्याय द्यावा कोणास,
सार्‍या माझ्याच भावना…
सुख ही माझे अन दुःख ही,
तरी ऊन्ह - पावसाचा खेळ काही.

सुकाळ कधी, कधी दुष्काळ,
भावनांचा कल्लोळ सारा…
म्हणले विसावु क्षणभर सर बनुन,
पण अकस्मात वीज चमकतात काही.

हसुन सुख संपवावे, रडून दुखः,
जस की आभाळ मोकळे करावे…
पण उद्याही परिस्थितीचा सुर्य उगवेल,
म्हणून आशा मावळतात काही.

खरे जगणे त्यालाची जमले,
राखुनी समतोल या मोसमांचा…
वृक्ष बनुनी दोन हात केले,
तव कठीण काळ आठवावे काही. - हर्षद कुंभार (०९-०४-२०१८ ३.५२)

#KshanKahiWechalele #harshadkumbhar

Wednesday, March 7, 2018

८ मार्च २०१८ महिला दिन

स्त्री जन्मा तुझी कहाणी…..

आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. दरवर्षी मी ८ मार्चला एक तरी कविता स्त्री जातीला समर्पित करतो. पण या वर्षी मी अनुभवलेल्या भावनांचा उद्रेक मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही कडव्यात सीमित करून तोकड्या शब्दांत मांडणे अयोग्य ठरले असते. यावेळी भरभरून लिहावे म्हणून हा लेख कारण त्याशिवाय भावनांना न्याय मिळाला नसता.

       स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजेच मातृत्व आणि असे म्हणतात मातृत्व आल्याशिवाय स्त्रीला पुर्णत्व नाही. मातृत्व म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच असतो स्त्रीचा. हे आपण वाचुन नाहीतर ऐकुन आहे. या सगळ्या गोष्टींचा माझा संबंध थेट आला तो पत्नीच्या मातृत्वाच्या निमित्ताने.

    २ मार्च रोजी सकाळी सासूबाईंचा फोन आला की पत्नीला दवाखान्यात दाखल केले आहे. मुळ तारीख होती १६ मार्च त्यामुळे असे अचानकपणे कळले तेव्हा तातडीने मी दवाखाना गाठला सुदैवाने मी गावीच होतो. तिथे गेलो तेव्हा पत्नी दवाखान्यातील आवारात फेर्‍या मारत होती. डॉक्टरांनी तिला प्रसववेदना याव्यात म्हणून हे सांगीतले होते. तसे तिला पहाटे ३ पासून वेदना जाणवत होत्या आणि डॉक्टरांनी तपासणी करून आजच प्रसूती होईल हे निश्चित सांगितले पण मुख्य कळ येण्यासाठी तिला फेर्‍या मारणे आवश्यक होते. तेव्हा सकाळी ९ पासून ते अगदी दुपारी १२.३० पर्यंत मी पत्नीला या फेर्‍या मारण्यासाठी साथ दिली. दरम्यानच्या काळात दर १५ ते २० मिनिटांनंतर तपासणीसाठी जावे लागायचे. आता इतका वेळ चालून माझेच पाय खुप दुखायला लागले तर पत्नीची काय अवस्था झाली असेल. तिला हे सुसह्य ह्वावे म्हणून मी थट्टा, विनोद करून तिचा हा वेळ मजेशीर घालवत होतो.

        पण इतका वेळ जाऊन देखील कळा हव्या त्या प्रमाणात येत नव्हत्या म्हणून डॉक्टरांनी मग सलाईनच्या आधारे प्रसववेदना यावी यासाठी इंजेक्शन दिले. त्यानंतर प्रसूतीसाठीच्या विशिष्ट पद्धतीच्या बेडवर पत्नीला झोपवले ते पण १२.३० पासून एकाच स्थितीत सलग चार तास तेव्हा कुठे ४.३८ ला आम्हाला आनंदच्या बातमी स्वरूपात कन्यारत्न झालेले कळले तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला आणि दिवसभराचा क्षीण क्षणात लोप पावला. त्या नंतरही पत्नीला बराच वेळ तसेच झोपुन रहायचे होते इतर उपचारासाठी. इतका वेळ आपण झोपेत सुध्दा स्थिर राहु शकत नाही आणि तिला शुद्धित तसे करायचे होते. यातही पत्नीने धैर्याने नैसर्गिक प्रसूतीसाठी मन घट्ट केले होते तिच्या प्रबळ इच्छाशक्ती मुळे ती शक्य झाली. प्रसृत झाल्यावर लगेचच पत्नीने हसतमुखाने डॉक्टरांना आधी बाळ दाखवायला सांगितले. यावर डॉक्टरांनी विशेष गौरवउद्गार केले आणि इतक्या वर्षात प्रथमच अशी स्त्री पाहिली जिणे इतक्या वेदना सहन करुनही हसतमुखाने ही मागणी केली असल्याचे सांगितले. यासाठी त्रिवार सलाम माझ्या पत्नीला तेव्हा स्त्रीला उच्च कोटीचे सामर्थ्य असते हे यावेळी अनुभवले. अजून एक सामर्थ्यवान जीव जन्माला आला याबद्दल अतिशय अभिमान वाटतो आहे.

सरतेशेवटी महिला दिनानिमित्त आणि गोंडस बाळाला जन्म दिला याबद्दलसुध्दा माझ्या पत्नीला मनापासून अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद. तसेच भुतलावरील सर्व स्त्री जातीला माझ्याकडुन महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. - हर्षद कुंभार (०८-०३-२०१८)

ब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर