जुन्या आठवणी भाग - १
ही जुनी आठवण दिवाळीमधील तेव्हा आम्ही चाळीत राहत होतो. दिवाळीमध्ये किल्ले बनवतात हे तर माहीत असेलच तुम्हाला. आम्ही जिथे राहत होतो त्या भाग वेताळपाडा . तिथे आधीपासूनच किल्ल्यांची स्पर्धा असायची. आधीची वर्ष फक्त इतरांचे किल्ले पाहण्यात गेली. ज्या वर्षी किल्ला बनवला त्यावेळी कोणता बनवावा म्हणून शोध सुरु झाला. बऱ्यापैकी माहीत असलेले किल्ले सारेच बनवत होते. म्हणून वेगळ काही तरी नवीन करावे असे वाटत होते. मग आम्ही गावी म्हणजे वाई तालुक्यातील एक किल्ला वैराटगड बनवला होता. अगदी हुबेहूब नाही पण किल्ला म्हणावा अस काही तरी बनले होते. त्यात टिव्ही वरील पौराणिक कथांवर आधारित कार्यक्रमाचे पडसाद म्हणून की काय महाराज यांच्या मागे आम्ही लहान मोटारीवर फ़िरणारे चक्र लावले होते. थोडी अजून सजावट म्हणून हळीव टाकून केलेली बाग आणि सलाईनच्या बाटल्या वापरून केलेले कारंजे.
एक दिवस स्पर्धेत सहभागी होतो म्हणून परीक्षक पण आले. अर्थात परीक्षक म्हणून कोणी थोर असे नव्हते पण त्यातल्या त्यात काही जाणकार आणि आमच्यापेक्षा वयाने मोठी असलेली काही लोक. परीक्षकांनी काही प्रश्न पण विचारले जसे की ह्या किल्ल्याबद्दल कसं कळलं आणि ते मागे फिरणार चक्र होत का त्या काळी वगैरे वगैरे …
पण समाधान एकाच गोष्टीच होत आमचा ७ वा नंबर आला होता. त्याच मूळ कारण हे की नवीन किल्ला त्यांना कळला होता म्हणून.
असो या पुढे अश्या जुन्या आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कोणी नाही वाचलेच तरी पुढे आयुष्याच्या उत्तर वयात हे पुन्हा चाळून पाहण्यात वेगळीच मज्जा असेल म्हणून तरी आठवणींचे संवर्धन - हर्षद कुंभार (१४/१०/२०१६ - ८.४६)
No comments:
Post a Comment