तु नसताना मला तुझा भास होतो
आपले पिल्लू माझ्या पाठीशी
घुसलेले असते तेव्हा जाग येते ,
डोळे अलगद उघडून पाहिले तर
निरागस ते शांत झोपलेले असते ,
वळून मग तुला ही नजर शोधते,
झोप गेलेली नसते पण
तुझे प्रथम दर्शन घेण्याला ही नजर जागीच असते,
मग तू येतेस रोजच्या डब्बा बनवण्याच्या घाईत मला उठवतेस ,
रोज नित्याची ही सकाळ
तू नसताना मला तुझा भास होतो.
आवरताना पिल्लूच मागे मागे फिरणे
बेल्ट, डब्बा गाडीची चावी मिळेल त्या वस्तू सोबत खेळत बसणे ,
आवरून सारे निघताना तुम्हा दोघांचा मला पडलेला घेरा,
पिल्लूच गोड पण स्पष्टपणे केलेले बाय बाय
तुझ शेवटी "लवकर ये" बोलणे ,
आज निघताना तू समोर नसताना मला तुझा भास होतो.
दिवसभर ऑफिस मध्ये भले मिनिटा-मिनिटाला नसेल बोलत पण
एखादा तरी मेसेज असतोच,
शेवटी "कधी निघणार" हा हक्काचा प्रश्न विचाराला जातोच,
मी पण अंदाजे वेळ सांगून ती पाळायचा पूर्ण प्रयत्न करतो
निघताना "निघतो" हा रीप्लाय करत घरचा रस्ता धरतो,
गाडी चालवताना हे सारे आठवते तू नसताना मला तुझा भास होतो.
दारावरची बेल वाजवली की पिल्लू धावत येवून
दाराजवळ घुटमळत बसते,
तु दार उघडल्यावर तिचे गोड हास्य माझे स्वागत करते,
पुन्हा सुरू होते तिचे मागे मागे फिरणे आणि उचलून घेण्याचा हट्ट करू लागते.
आज घरी आल्यावर तू नसताना मला तुझा भास होतो.
फ्रेश होऊन बसलो की
चहाचा वाफाळता कप घेऊन तू येतेस,
दिवसभराचा क्षीण मग
काही घोट घेत नाहीसा होतो,
जोडीला काही गप्पांची सोबत घेत
चहाची मज्जा द्विगुणित होते.
आज एकट्याने चहा घेताना मला तुझा भास होतो.
रात्रीच्या स्वयंपाकात तुझी सोबत मिळावी म्हणून
थोडा मदतीचा आधार घेतो,
अर्धा अर्धा स्वयंपाक करण्याचा थोडा मान घेतो,
पिल्लूच्या लुडबुडने जरा उशीरच होतो,
तिला पण कडेवर घेत थोड बाळकडू देतो,
आज किचन मध्ये तू नसताना मला तुझा भास होतो.
पिल्लूच जेवण आपल्या आधीच असते
तिला भरवताना मात्र तुझी चांगलीच दैना उडते,
नंतर आपण जेवताना तिच्यासाठी ही ताट मांडावे लागते
खोट खोट आमच्यासारखे तीही मग नाटक करते,
आज एकट्याने जेवताना मला तुझा भास होतो.
पिल्लूच्या उशीरपर्यंत जागण्याने
आपला दिवस रात्री उशिरापर्यंत सुरूच असतो,
तिच्याशी खेळत पण वेळेचे भान ही नाही उरत
तिला झोपवताना तुझी अंगाई ही कमी पडते,
शेवटी दमून भागून तुम्ही दोघीही झोपता
पूर्ण दिवस असा काहीसा मावळतो,
आज पूर्ण मोकळ्या घरात तू नसताना मला तुझा भास होतो. - हर्षद कुंभार
#harshadkumbhar #KhanKahiWechlele #maharashtra #pune #blogger
#marathi #kavita #marathikavita