ती एक रहस्यमय रात्र
खूप जुना किस्सा आहे असे नाही पण १-२ वर्षे झाली असतील. प्रसंग तसा छोटाच आहे पण अजुनही सस्पेन्स मध्ये आहे. ही गावाकडे घडलेली घटना आहे त्याचे झाले असे की. मी, माझा भाऊ आणि मेहुणा आम्ही रात्री माझ्या कार मध्ये झोपायला गेलो होतो.
कार मध्ये झोपायला जाण्या पूर्वीची कहानी अशी होती की मला गावी थंडी मध्ये प्रचंड सर्दी आणि कफचा त्रास होतो अजुनही. आणि गावी त्यावेळी आमचे घर म्हणजे स्टील चे पत्रे असलेले त्यामुळे रात्री थंडी खूप प्रमाणात घरातील वातावरण थंड करून टाकायची. अश्या परिस्थितीत झोप येणे शक्य नसायचे. रात्रभर जागून काढायचो कारण झोपलो की छाती पूर्ण जॅम होत असे आणि श्वास घेण्यासाठी पण त्रास होत होता.
त्यावेळी मी असाच ४-५ दिवसा करीता गावी गेलो होतो आणि पहिल्याच दिवशी मला त्रास झाला. मग काय उपाय काय करावा म्हणुन मला आयडिया सुचली की कारचा ऐसी गरम वर ठेवून झोपू म्हणजे झोप लागेल. कारण झोपण्यापूर्वी कितीही शेकोटीच्या शेजारी बसलो तरी मध्य रात्री पुन्हा तीच अवस्था होत होती. आणि गावाकडील लोक तर म्हणायची की शेकोटी शेकली की अजून थंडी वाजते.
दुसर्या दिवशी माझे ठरले होते गाडीतच झोपायला जायचे तशी वडीलांना पूर्वकल्पना दिली होती. पण त्यातही एक चिंता वजा भीती मला होती ही की एकट्याने कसा झोपू. कारण गाड्या खाली पार रस्त्याच्या कडेला लावलेल्या असतात. हा रस्ता म्हणजे सातारा-वाई रस्ता रात्री वाहने कमीच असतात आणि शहरी भागातील असणारे पथदिवे इथे नाही त्यामुळे चहूबाजूंनी काळाकुट्ट अंधार.
यावर उपाय आणि सोबत म्हणुन मी माझ्या चुलत भावाला तयार केला अर्थात त्याला माझा थंडीचा त्रास माहीत होता. तो म्हणजे एक भाऊ कमी आणि दोस्त जास्त त्यामुळे आम्ही एकमेकांना नेहमीच प्रत्येक प्रसंगात साथ देत असतो. मग काय आमचे ठरले २ गोधडी घेऊन जाऊ आणि गाडीत झोपू असे ठरले.
रात्री १० च्या सुमारास जेव्हा पूर्ण वाडीतील लोक अर्ध्या झोपेत पोहोचली तेव्हा आम्ही निघालो गोधडी घेऊन आणि जाताना मध्ये मेहुणा भेटला. त्यांचे घर खाली रस्त्याकडे जाताना मध्ये लागते म्हणुन जाताना त्याला आवाज देऊन गेलो तर तो पण येतो म्हणाला.
गाडीत आम्ही किती वेळ तरी गप्पा मारल्या तरी रात्री १२-१ झाले तेव्हा कुठे जरा झोप येऊ लागली. हे दोघे झोपून पण गेले मी आपला जरा झोप लागेल का नाही या धास्तीने झोपेचा प्रयत्न करत होतो. आता गाडीत शेवटी अवघडल्यासारखं होत असल्याने किती झोप येणार मग मेहुणा म्हणाला मी जातो घरी झोपायला आणि तो गेला. आता गाडीत पुढे मी आणि मागच्या सीट वर भाऊ असे दोघे होतो.
बाहेर कडाक्याची थंड होती त्यामुळे गाडीचा ऐसी गरम वर ठेवल्याने मस्त वाटत होते. पण पुढे बसुन बसुन काय झोप येईना मला आणि भाऊ मात्र मागे मस्त आडवा होऊन झोपी गेला होता.
अधून मधून एखादी गाडी ये जा करत होती. मी गाडीत बसून जागा होतो त्यामुळे आजुबाजूला लक्ष जात होते.
रात्री उशिरा २-३ आसपास अशीच एक टाटा सुमो गाडी आमच्या वाडीच्या जवळ येउन थांबलेली मी पाहिली. मी जरा जागाच होतो त्यामुळे साहजिक माझे लक्ष गेले आणि पाहू लागलो तर गाडी मुळात येतात हेड लाइट बंद करून आली होती आणि जवळ येऊन थांबली आणि त्यातून २ माणसे उतरली आणि त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेला प्राणी आता तो कुत्रा होता की बकरी की कोंबडी देव जाणे. मलाही स्पष्ट दिसत नव्हते ते त्यांनी पोत्यात घालून गाडीत टाकून पसार झाले.
हा काय प्रकार घडला मी आपला लपून हे सगळे पाहिले होते आणि भावाला उठवणार तर तितका वेळ त्या चोरांनी दिला नाही इतक्या जलद गतीने त्यांनी ते सारे केले होते. झाले आता तर काय टेंशन मध्ये मला काय झोप लागली नाही आणि रात्रभर मी पाळत ठेवल्या सारखे जागा राहिला होतो.
दुसर्या दिवशी मी घडला प्रकार सांगितला पण कोणाचे काही चोरीला गेल्याचे कोणी बोलले नाही. आता मात्र मला कळेना झालेला प्रकार खरच घडला होता की माझा भास. त्यामुळे ती घटना एक रहस्य बनून राहिली आहे. - हर्षद कुंभार
#harshadkumbhar #KshanKahiWechalele #memories