जुन्या आठवणी भाग - ४
माझ लहानपण आणि मी सॉलिड करामती आहेत बरं. त्यातील एक आठवण्याचं कारण आज आॅफिसच्या बाहेर एक चहाची टपरी आहे तिकडे चहा प्यायला गेलो होतो. चहा पिताना अचानक एक छोटसं गोंडस कुत्र्याचं पिल्लू समोर आले. मी त्याला विशिष्ट (आपण नेहमी जस बोलवतो यु यु नाहीतर चू चू करून )आवाजाने बोलवले तर ते माझ्याकडे पळत आले आणि माझ्या शुजवर पुढचे पाय ठेवून एकदम रुबाबदार पद्धतीने उभे राहिले ( कल्पना करायची म्हणाल तर सिंबा मुव्ही मध्ये टेकडीवर छोटा सिंबा सूर्याकडे पाहत असतो अगदी तसंच भासलं मला ). मला इतके कौतुक वाटले की लगेच मी खाली वाकून त्याला गोंजरले.
जुनी आठवण म्हणाल तर माझ्या लहानपणी म्हणजे मी अगदी ४-५ वर्षाचा असेल आणि आम्ही जिथे चाळीत राहत होतो तिथे पण अशीच ३-४ पिल्ले होती आणि त्यांची आई असे कुटुंब होते. मी सारखा दिवस रात्र तिकडेच खेळायला त्या पिल्लांसोबत. माझी आई अजूनही मला त्या आठवणी सांगते की मी पिल्लांमधला एक की काय म्हणून त्या पिल्लांची आईपण मला कोणतीच हरकत न घेता त्यांसोबत खेळू देयची. अर्थात मी इतका लहान होतो की त्या पिलांचे कान पकडून त्यांना झुला झुलवायचो. आई तर म्हणायची की मी खूप हाल करायचो त्या बिचाऱ्या पिल्लांचे. मला अगदीच सगळं स्पष्ट आठवते असे नाही पण एक काळ्या रंगाचा आणि एक भुऱ्या तपकिरी रंगाचा असे काहीशी पिल्ले होती आणि त्यांचे कान पकडून त्यांना समोर धरून त्यांच्याशी काय बोलायचो देव जाणे.
आजही मी आईकडून ते दिवस आठवून घेतो खास करून पिल्लांचा विषय ते ऐकून माझं मलाच कुतूहल वाटत… - हर्षद कुंभार (२३/११/२०१६ ९.०२ ).
No comments:
Post a Comment