जुन्या आठवणी भाग - ३
रायगडावर जेव्हा जाग आली. हे वाक्य तुम्हाला या पुढील लेखातून कळेलच. ही आठवण आहे तेव्हाची जेव्हा मी भिवंडीला राहत होतो. माझी कंपनी गोरेगावला होती त्यामुळे मुंबईचा आणि माझं संबंध तसा रोजचाच. सोशल नेटवर्किंग मुळे माझी मुंबई मधील महाराष्ट्र ट्रेकर्स या ट्रेकिंग ग्रुप सोबत ओळख झाली आणि पहिला ट्रेक केला तो रायगडचा.
२ दिवसांच्या ट्रेकमध्ये २ गोष्टींनी खूप प्रभाव पडला. एक म्हणजे सर्वात महत्वाच आहे ते महाराजांबद्दल आदर एका वेगळ्या उंचीवर पोचला तो आणि दुसर टकमक टोकावरून खाली ३५० फुट Rappelling (ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी म्हणजे दोरीच्या सहाय्याने खाली उतरणे.).
महाराजांबद्दल आदर प्रत्येकाला आहेच, पण त्याच स्वरूप खूप लोकाच्या मनात वेगवेगळे आहे जे काही योग्य आणि काही अयोग्य प्रमाणात. अर्थात मीही त्याआधी अयोग्य पातळीत होतो पण रायगड ट्रेक केला आणि मला जाग आली असच मी म्हणेन.
महाराज म्हणजे इतिहासात अजरामर झालेलं एक व्यक्तिमत्व. त्यामुळे आम्हाला कमी अधिक प्रमाणात जी काही माहिती होती त्यात भर पडावी म्हणून ट्रेकमध्ये दुर्ग संवर्धन आणि इतिहास संशोधन करणाऱ्या शिल्पाताई परब
यांना आग्रहाने बोलवले होते. त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि महाराजांप्रती सांगितलेली माहिती याने आमचे अज्ञान दूर तर झालेच शिवाय आमचा दृष्टीकोन बदलला.
महाराजांना महाराज किंवा छत्रपती यानेच संबोधणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी समजावले. आपण महाराजांना एकेरी नावाने संबोधणे योग्य नाही कारण तितके आपण लायक नक्कीच नाही. म्हणून जय भवानी …. असे म्हणने पण योग्य नाही. त्यांनी आम्हाला त्यावेळी एक ललकारी शिकवली होती, ज्यावेळी पण महाराजांचा जयघोष करायचा असेल तेव्हा हीच ललकारी म्हणा असे त्यांनी सुचवले होते.
|| जल, स्थल, अम्बर दे ललकार
शिवछत्रपतींचा जयजयकार ||
त्याचं हे म्हणन मला अगदी मनापासून पटल जस की आपण वडिलांचा उल्लेख करताना माझे बाबा,वडील किंवा पप्पा असाच करतो ना , नाकी नावाने बोलतो मग तसाच महाराजांना पण महाराज असाच केला पाहिजे.
तेव्हापासून मी आजतागायत फक्त महाराज म्हणून उल्लेख करतो दुसरा कोणी नाहीच माझ्यासाठी महाराज म्हणण्यासारखे. म्हणून मी म्हटलं होत रायगडावर जेव्हा जाग आली.
दुसरा एक अनुभव म्हणजे Rappeling जे प्रथमच तेही ३५० फुट केले होते. २ दिवसाच्या ट्रेकमध्ये पहिल्या दिवसापासून Rappeling सुरुवात झाली होती. अनुभवी लोकांना प्रथम पाठवलं होते जेणेकरून आम्हाला सर्व कळेल. पहिल्या दिवशी काय नंबर आला नाही आणि दुसरया दिवसापर्यंत भीतीने पार जीव जायची वेळ आली होती. अंतरवक्र आकारात असलेला टकमक टोक दोरी द्वारे इतरांना उतरताना पाहून टेन्शन तर खूपच आले होते. थोड्या अंतरानंतर उतरणारा अजिबात दिसत नव्हता. जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा पोटात गोळाच आला होता पण हिम्मत केलीच जे होईल ते होईल म्हणत सुरु केले. भिती हळू हळू गेली पण हवेचा झोत जे काही हेलकावे देत होता विचारू नका, जस काही तो माझ्या हिम्मतीला, धिराला धक्का लावायचं काम करत होता. पण स्वतःला समजावत मी सरांनी सांगितल्याप्रमाणे आजूबाजूचा सर्व परिसर अनुभवला. भिती,थरकाप, दम, हिम्मत आणि नयनरम्य निसर्गाचा आस्वाद या सर्व गोष्टी एकत्रित अनुभवल्या होत्या. आकाश आणि जमीन या मध्ये दोरीवर लटकण्याचा तो अनुभव खूप रोमांचक होता. खाली पहिले की आमचे सहकारी अगदी १-२ इंच इतकी दिसत होती. कधी खाली पोचतोय असे झाले होते.
एकदाच खाली पोचलो तेव्हा शरीर एकदम हलक झाल्यासारखं वाटत होत अगदी शून्य गुरुत्वा सारखं. भानावर आलो तेव्हा जगातली ही इतकी मोठी गोष्ट केल्याचा स्वतःचा सार्थ अभिमान वाटू लागला होता. आयुष्यातले हे २ अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. - हर्षद कुंभार २३/१०/२०१६ ४.१५