Sunday, May 8, 2011

आठवणीतले मे महिने


                                                                                                
                              आठवणीतले मे महिने 

मे महिना म्हंटले तर सगळ्यांना आठवते ते घाम,गरमी,उकाडा. जरा शाळेत असतानाचा मे महिना आठवून पहा बर,  वाटले ना सुखद. असणारच तो काळच मस्त होता. मी आता तुम्हाला माझ्या मे महिन्याबद्दल सांगणार आहे जो आम्ही शाळेत असताना अनुभवला आणि आठवणीत जपला आहे. सध्या मे महिना चालू आहे, त्यामुळे मला माझे जुने दिवस आठवले म्हणून लिहावेसे वाटले. तर ७ -१०  मे या तारखेत आम्ही ३ कुटुंब गावाला जायचो. त्यावेळेस गावाला जायच्या आधीच आमची गावाला काय काय करायचे याचे प्लानिंग आम्ही भांवडे करायचो. तुम्ही म्हणाल ३ कसे तर थोडे कुटुंबाबद्दल सांगतो म्हणजे अजून नीट कळेल तुम्हाला.माझ्या कुटुंबात आम्ही ३ भाऊ आई, बाबा मिळून  ५ . नंतर माझे २ काका आहेत त्याच्यात मोठे काका त्यांचा घरात ६ मेंबर ,२ नंबरचे काका त्यांच्या घरात ७ मेंबर, तर असे सगळे मिळून १८ जन आम्ही जायचो.माझे दोन्ही काका ST महामंडळाच्या सेवेत होते, म्हणून कसला त्रास नव्हता तसा 

त्याकाळी आम्ही सकाळी ६ ची बस ठरलेली असायची भिवंडी - इचलकरंजी. आता आम्ही १८ जन म्हणजे बसमध्ये जास्त आम्हीच, जसे काही family टूर वाटायची.
ह्या सगळ्या गोष्टी साल २००० पूर्वीच्या आहेत, त्यावेळी मुंबई - पुणे एक्प्रेस हाईवे नव्हता त्यामुळे सध्याच्या जुन्या हाईवेने आमचा प्रवास त्यामुळे साहजिक आम्हाला ७ तास लागायचे गावाला जायला. 
बसने जाताना मी आणि माझा २ नंबर काकांचा मुलगा आम्ही दोघे ड्राइवरच्या तिथे शेजारी केबिनमध्ये बसायचो. आम्हाला तिथे बसायला खूप आवडायचे.तेव्हा गाडी चालत असताना समोर बसून  पाहणे म्हणजे काय मज्जा असते जे पुढे बसतात त्यांना माहित असेल. ड्राइवर काकांना आम्ही उगाच रेसिंग लावायला सांगायचो. मग तेही दुसऱ्या गाडीला ओवरटेक करायचे.खूप मज्जा वाटायची तेव्हा लोणावळा ,खंडाळा जवळ आला की दर्या, खोऱ्या बघायला खूप गम्मत वाटायची, खंडाळ्याचा वळणदार घाट तुम्हाला माहित असेलच.

तर असे बसमध्ये धमाल करत आम्ही सकाळी ६ ला  निघालेले गावाला दुपारी २ - २ .३० पर्यंत पोचायचो. आमचे गाव पुणे - सातारा हाईवेमध्ये पाचवड फाटा म्हणून आहे. त्या पाचवड स्टेण्डला दुपारी पोचायचो मग दरवेळेस ठरल्याप्रमाणे आमचे पाय त्या  रसाच्या गुऱ्हाळाकडे जायचे ते नित्य ठरलेले होते. तिथे मस्त २  ग्लास रस घेतल्यावर आमची पदयात्रा चालू होयची, आमची कुंभारांची वाडी आहे सातारा - वाई  रोडलगत पाचवड स्टेन्ड पासून १ - २ km वर आमची वाडी आहे. तिथे पायी चालत जाताना दुतर्फा आंब्याची झाडे आमचे मुख्य आकर्षण असायचे. कोणत्या झाडाला किती आंबे आहेत हे बघून ठेवत असू आम्ही, खाली रस्त्याला पडलेले आंबे चाचपून बघत आम्ही पुढे वाडीकडे वाटचाल करायचो.
आमची वाडी म्हणजे १० - १५  घरांची फक्त. सगळे भावकीतले. वाडीत आमची ४  घर सामोरा - समोर होती. तीन घर ३ चुलत आजोबा यांची आणि एक आमचे, तर वाडीत आलो की पहिले आम्ही भावंडे मागे सपरात जायचो, तिथे आमची जनावरे असायची आता जास्त नाहीत बैल तर एकही नाही फक्त म्हशी आहेत. बैल,गायी,म्हशी आणि नवीन वासरू वगैरे आहे की नाही. त्या वासराला चरायला नेहायला आम्हाला प्रचंड आवडायचे. मागे सपरात ना एक आंबाच्या झाड आणि जांभळाचे झाड त्या  जांभळाची जांभळे अशी टपोरी मोठी मोठी ना काय सांगू तुम्हाला,  एक डाळिंबाचे पण झाड होते. वाडीत एक पाण्याचा आड आहे १२ महिने त्या आडाला पाणी पावसाळ्यात तर पाणी इतके वरती असते की सहज हाताने घेवू शकतो. जवळच एक छोटासा पाट आहे मग आमची स्वारी पाटाला पाणी आहे की नाही पाहायला . वरती माळाला मोठा कॅनल आहे आम्ही त्यावेळेस  खूप घाबरायचो कॅनलमध्ये पोहायला, आम्ही आपले पाटात खुश. पाट बघून आलो की सकाळी पोहायचे प्लांनिंग सुरु होयाचे. 

संध्याकाळी  आम्ही अंगणात जेवायला बसायचो, मस्त ४ घरातला स्वयपाक एकत्र बाहेर यायचा. मग ज्याला जे आवडेल तसे तो घेयचा. जेवताना मग सगळ्यांच्या गप्पा कुणाचे काय चालले आहे वगैरे. जेवण आटोपले की जोपायाची तयारी  तुम्हाला माहित असेल गावाला किती लवकर जोपतात ते. मग अंगणातच सगळ्यांचे अंथरून असायचे  तेव्हा गावाला उश्या,पांघरून जास्त नसायच्या मग आमची भांडणे मला पाहिजे वगैरे.. घरातले मोठे कसेतरी समजूत काढायचे पण मग थोड्या वेळाने सगळे जोपले की ह्याची पांघरून खेच त्याची उशी खेच हा प्रकार होयचा सकाळी ज्याला त्याला कळायचे कुणाचे काय काय गेले ते. वाडीच्या आजूबाजूला सगळी शेती आमची त्यामुळे मेमध्ये पण रात्रीची थंडी लागायची तिकडे. सकाळी ६ -७  ला  जाग येतेच गावाला आणि इथे शहरात १०  वाजले  तरी उठायचे नाव नसायचे आता ही आणि तेव्हाही. मग  सकाळी ब्रश आणि  टॉवेल आदि वस्तू घेवून पाटाकडे निघायचो आम्ही,  ब्रश आणि नैसर्गिक विधी वगैरे आम्ही जाताना आवरून घेयचो मग पाटात सगळ्यांच्या उड्या असायच्या. १ तासभर खेळून झाले की सगळे घराकडे, त्यावेळेस  विहिरीत पोहायची खूप भीती वाटायची त्यामुळे तिथे कधीच गेलो नाही.  घरी आलो की मस्त भूक लागलेली असायची मग चहा चपाती वर सगळे. इथे घरी मी कधीच चहा चपाती खाल्ली नाही पण गावाला का कुणास ठावूक मी आवडीने खायचो. 
पेट पूजा झाली की आमचा मोर्चा असायचा रानात, तिथे करवंदाच्या जाळी शोधायचो कुठल्या जाळीला करवंदे जास्त आहेत बघायचो . करवंदे तेव्हा पिकलेली नसायची. कारण एक तरी पाऊस पडावा लागतो तेव्हा पिकतात ती आणि मेमध्ये गावाला पाऊस होतोच होतो कधी कधी गारांचा बर का, तुम्ही आताच बातम्यांमध्ये  पाहिलं असेल सातारा, कराड भागात गारांसह पाऊस. गारांचा पाऊस म्हंटले की आम्ही प्लेट घेवून पावसात त्या गारा झेलायला किव्वा जमा करायला.  त्या गारांची चव वेगळीच आणि मस्त असायची. मग काय पाऊस पडला की करवंदे पण पिकायची. वारा सुटला की आंबे पण पडायचे आम्ही मग रस्त्याला बघायला जायचो आंबे गोळा करायला. सपरातले  जांभळाचे  झाड राहिले की तिथे तर मेमध्ये हमखास जांभळे असायचीच,पण तिथे एक अडचण असायची त्या झाडाला नेहमी आमची मारकी गाय नाहीतर मारका बैल बांधलेला असायचा त्यामुळे आम्हाला ना थोडे कस्ट करायला लागायचे. आमच्यातला एक त्या जनावराला स्वताकडे खिळवत ठेवायचा आणि मग बाकीच्यांनी झाडावर जायचे. 

आमची वाडी डोंगराच्या पायथ्याला असल्याने जवळ डोंगरात जळण आणायला जायला खूप आवडायचे आता त्या डोंगराला दगड खाणीने सगळे खावून टाकले आहे वाईट अवस्ता आहे डोंगराची. डोंगराला शोभाच राहिली नाही आता पहिल्यासारखी. आमच्या वाडीला नैसर्गिक सौंदर्य जे काही लाभले आहे ना ते तोड नाही, डोंगरातून वाडीजवळ जे ओढे येयचे ना ते इतके मोठे आणि खोल दरी सारखे आहेत. काही ओढे तर इतके घनदाट आहेत की खाली तळला सूर्यप्रकाश पोचत पण नाही. आम्ही त्या ओढ्या - ओढ्यातून करवंदे आणायला जायचो. 

तिकडे शेतात खत टाकायची कामे आम्ही आवडीने केली आहेत आजही करतो.  खत बैल-गाडीत  भरताना ना त्या खताच्या उकिरड्यात एक मोठा अळीसारखा किडा सापडायचा "हुमणी" बोलतात त्याला गावाकडे आम्ही खूप घाबरायचो त्याला, आमचे काका मुद्दाम त्याला आमच्या शर्टमध्ये  टाकायचे, तेव्हा काय होत असेल आमचे विचार करा. खत टाकून झाले की मग अंघोळीला पुन्हा पाटावर. तिथे आमची २ - ३ वेळा अंघोळ होयची दिवसातून. 

गावाकडे एकाच घरात TV तो पण फक्त शुक्रवारी हिंदी पिक्चर आणि रविवारी मराठी पिक्चर तेव्हडेच बघायचो. गावाकडे TV चे जास्त आकर्षण नव्हते. दिवसभर भटकायचे.  असं सगळे करता करता जून कधी येयचा कळायचे नाही मग शाळा सुरु होयच्या आधी २ - ३ दिवस पुन्हा घरी भिवंडीला . अश्या सगळ्या मे महिन्याच्या आठवणी जमा करून आम्ही ठेवल्या आहेत. आज सगळी भावंडे जॉबला  आहेत त्यामुळे आधीसारखे एकत्र जाने होत नाही. कधी लग्नाला जमली तर ते पूर्वीचे दिवस आठवतो ती धमाल आठवतो. बरे वाटते नाही ! 
                                                                                                                                           - हर्षद कुंभार 
Post a Comment

ब्लोगच्या नोंदी मिळवा तुमच्या अकाउंटवर