लसीची रांग
तारीख : २६/०४/२०२१
वेळ : सकाळी ७:००
स्थळ : प्राथमिक आरोग्य केंद्र, भुईंज, वाई.
आदल्या दिवशीच मामींचा कॉल आला उद्या लसीची नोंदणी झाली आहे सकाळी लवकर जावून नंबर लाव. त्यानुसार मी सकाळी ७ च्या आधीच केंद्रावर पोहोचलो, पाहतो तर काय माझ्या आधीच १४ जण रांगेत उभे आहेत. तिथे असलेल्या नर्स बाईंना नाव नोंदवून घेण्यासाठी विचारले तर त्या म्हणाल्या आजपासून कागदावर नाव नोंदवले जाणार नाही. शुक्रवारी असेच केले होते आणि त्यानंतर बराच गोंधळ झाल्याने ते बंद केले आहे. तुम्हाला इथेच रांगेत उभे राहावे लागेल. मी आपला सकाळी सरळ काही न आवरता इथेच आलो होतो म्हणले नाव नोंदवून मग घरी सगळे आवरून नंतर आरामात मामींना आणले असते. पण आता तिथेच थांबणे भाग होते त्यात रांगेतील लोक बर्यापैकी वयस्क मंडळी होती म्हणले आपण पण थांबू थोडा वेळ नंबर लावून मग जाऊ आणायला. त्यांना मागच्या वेळी लस न घेता घरी जावे लागले होते म्हणून आधीच काही जण चिडलेले होते. त्यातील एक वयस्क सेवानिवृत्त शिक्षक असल्याने त्यांनी रांगेची शिस्त लावली होती ती बराच वेळ टिकली पण होती. त्या वयस्कर लोकांमध्ये मला धरून २/३ तरुण असतील जे कोणासाठी तरी रांगेत उभे होते. हळू हळू लोक येयला लागली होती.
मुळात दहा वाजता सुरू होणारे लसीकरण असले तरी फक्त दिवसागणिक १००/१५० होत असलेल्या लसीकरणात आपला नंबर लागावा म्हणुन लोक सकाळी सात वाजता नंबर लावत होती. काही न खाता पिता ही लोक तिथे आली होती एकदा का रजिस्टर वर नाव नोंदविले की घरी जाऊन आवरून येऊ या धारणेतून सकाळचा हा खटाटोप. पण आजचे चित्र वेगळे होते कोणाला जाता आले नाही १०:३० वाजे पर्यंत तरी. बघता बघता रांग खूप मोठी झाली जवळपास ४०० पर्यंत नंबर झाले होते. जुना अनुभव असलेली जागरूक लोक थोड्या थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा रांगेतील लोक मोजत होती. कारण एकच आज तरी आपला नंबर लागेल का?. सगळ्यांनाच नाही जमत घरची कामे सोडून सकाळी रांगेत उभे राहायला त्यामुळे केंद्राने दिलेल्या वेळेत ते येत होते.
तिथे असलेल्या नर्स पण वारंवार सांगत होत्या तुमचा नंबर तुम्ही लक्षात ठेवा इथे आम्ही नोंदवत नाही. तुमच्या मागे आणि पुढे असलेल्या व्यक्तीला पाहून ठेवा. सर्वात पहिला नंबर असलेली बाई गेले ४ दिवस येत होती पण उशीर होत असल्याने तिला लस मिळत नव्हती त्यामुळे ती आज ६ लाच आली होती लांबून नक्की गाव माहीत नाही. काही लोक इतक्या वेळा येवून गेली होती की त्या नर्स बाईंना पण आता ती लोक माहीत झाली होती त्यातील ही बाई पण एक होती. एक आजोबा तर चक्क पूर्ण तयारीनिशी घरून डब्बा, पाणी आणि बसायला छोटासा स्टूल पण घेऊन आले होते. त्यांच्या सोबत कोणी नव्हते त्यांच्या ऐवजी रांगेत उभे राहायला त्यामुळे त्यांना हे सर्व करणे भाग होते.
काही लोक दुसर्या डोस साठी रांगेत होते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना वेगळी रांग हवी होती पण तितके व्यवस्थापन तिथे नव्हतेच. मुळातच एक मुख्य प्रवेश असलेले केंद्र तिथे #covid तपासणी साठी पण त्याच बाजूने आत जात होते. आज रांग पाहून शेवटी पोलिस तिथे आल्याने तपासणी साठी आलेल्या लोकांना केंद्राच्या मागील बाजूने येण्यास रांग लावायला सांगितली गेली. विदारक चित्र असे होते की मुळात आम्ही उभे असलेली रांग पण रेशनच्या रांगेसारखी जवळपास खांद्याला खांदा लावून लागली होती. अंतरावर उभे राहण्याचे महत्व एकालाही नव्हते. काहींनी मास्क नावापुरता तोंडाला लावला होता कारण त्यांना तंबाखू थुंकायला बरे पडते ते पण अगदी जवळच, रांग सोडून लांब थुंकणे त्यांना सोयीचे वाटले नाही.
सकाळपासून म्हणजे २ तास झाल्यानंतर बर्यापैकी सगळे चेहेरे ओळखीचे वाटू लागले होते. कोण कोणत्या नंबरला आहे माझ्या मागे पुढे कोण आहे हे कळले होते. कंटाळून खूप जण खाली जमिनीवर बसून गेले. केंद्रात झाडे खुप असल्याने सावली चांगली होती आजुबाजूला अगदी गर्द अशी त्यामुळे सर्वांना हा उन्हाळा सुसह्य वाटत होता. Social Distancing अजूनही कोणी पाळत नव्हते या परिणाम कदाचित काही दिवसांनी दिसून येईल. आमच्या मागे काही बायका तर ग्रुप करून गप्पा मारत बसल्या होत्या आणि काही तर चक्क दगडाचे सागर-गोटे खेळ खेळत होत्या. ज्याला कोणाला इथे केंद्र आहे हे माहीत नसेल त्यांना दुरून एखादी पिकनिक चालू असेल असे नक्कीच वाटेल.
वयस्कर लोकांमधे ही पण एक चर्चा होती की १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण आहे तर तेव्हा अक्षरशः चोंबाळ (हा त्यांचा शब्द आहे) होईल. कदाचित हाणामारी पण होईल तरुण पोरांची त्यांना असेही वाटत होते की निदान ४५ वरील लोकांचे तरी लसीकरण पूर्ण होऊ देयला पाहिजे होते. वयस्क व्याधींनी ग्रस्त लोकांना मरण जवळ आल्याचा भास होतो आहे हे यातून कळले. तरुण पोर त्यांची प्रतिकार शक्ति चांगली असते ते कसेही वाचतील पण आमच्या सारख्यांचे काय हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. त्यामुळे ह्या शेवटच्या आठवड्यात लस घेतलीच पाहीजे म्हणुन झालेली ही गर्दी आहे हे माझ्या ही लक्षात आले होते. माझ्या सारखे कमी जण होते जे कोणासाठी तरी रांगेत उभे असतील. काही बायका तर आमचा परवा दिवशी शेवटपर्यंत चोथा नंबर होता आता तरी पुढे मिळवा लवकर म्हणुन बऱ्याच वेळ भांडायला लागल्या पण कोणीच त्यांचे ऐकत नव्हते. शेवटी काही समंजस लोक त्यांना आपल्या जागेत पुढे मागे घेत होते ते पण अश्या अटी ने की सर्व जण २-२ जणांचे नंबर लावू शकत होते (हा नियम रांगेतील लोकांकडूनच जन्माला आला होता केंद्राकडून असे काही निर्बंध नव्हते त्यामागे कारण ही असे होते की आधीच्या काही दिवसात कोण एक माणूस येत आणि गावातील १० लोकांचे नाव नोंदवत लस घेयचा म्हणुन बाकी लोकांची अर्थातच गैरसोय होत होती आणि नंबर लावून पण लस मिळत नव्हती). आणि जे एकटे आले होते त्यांनी अश्या लोकांना आपल्या नंबर सोबत दिले होते त्यातील मी पण एक होतो.
२-३ तास उलटून गेले होते आणि काही वेळात लसीकरण सुरू होईल असे नर्स बाईंनी सांगितल्यावर लोकांची आता एकमेकांना ओळख असल्याने प्रत्येक जण आपापल्या घरी जावून सोबतच्या व्यक्तीला आणत होते. काही जण जेवून-खावून येतो असे बोलुन ही गेले होते. मी पण मामीं ना १०.३० च्या आसपास आणायला गेलो होतो. मी सकाळी आलो तेव्हा माझ्या पुढे एक गृहस्त होते ते सकाळी कानटोपी, मास्क असे लावून आले होते आणि त्यांना धार काढायला जायचे आहे म्हणून मला आणि आमच्यापुढे असलेले शिक्षक त्यांना सांगून गेले होते. मी जेव्हा परत आलो तर माझ्या पुढे वेगळेच कोणी आले की काय म्हणून मी विचारणा केली कारण सकाळी गेलेला माणूस वेगळ्याच कपड्यात होता. शेवटी त्याने मीच तो धार काढायला गेलो होतो (एकदम हसा पिकली रांगेत) सांगितले तेव्हा हायसे वाटले की बाबा तोच माणूस आहे.
११ वाजले तसे सातारा वरून एक गाडी लस घेऊन आली आणि आमचा जीव भांड्यात पडला कारण काहींना शंका होती लस येईल की नाही. आता पटापट सगळे लसीकरण उरकून घरी जाता येईल. पण म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न (मामींच्या तोंडातील वाक्य) तसेच काहीसे घडले होते. आधीच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे लसीकरण १०-१० च्या संखेने पटकन उरकते आणि आमचा नंबर १५ (x२ = ३०) धरला तरी लवकरच लागला पाहिजे. पण इथे पहिलेच ५ मध्ये ३० मींन पेक्षा जास्त वेळ लागत होता. न राहवून आम्ही चौकशी केली असता असे कळले की आधार कार्ड ची वेबसाइट खूपच हळू हळू चालत आहे त्यामुळे प्रत्येकाच आधार कार्ड तपासून पुढे पाठवायलच खूप वेळ जात आहे. वयस्क लोकांना हे टेक्निकल कारण समजून सांगायला आमची दमछाक होत होती ती वेगळी. ९५ टक्के वयस्कर रांगेत होते ज्याना त्यांचा मोबाइल नंबर देखील माहीत नव्हता त्यांनी एक छोट्या कागदावर लिहून आणला होता त्यांना कम्प्युटरच हळू चालतोय हे कारण पटलेले होते.
बराच वेळ गेला १२ वाजून गेले तरी पहिले १० पण नंबर झाले नव्हते. शेवटी मामी म्हणाल्या तू जा घरी आवरून, जेवण करून ये आरामात मी तुला कॉल करेन माझे झाले की ये आणि त्यांना कळून चुकले होते की इथे खूप वेळ जाणार आहे. आणि मला पण २:३० वाजता ऑफिसची शिफ्ट चालू होणार होती त्यामुळे नाईलाजाने जाणे भागच होते. मी घरी आलो आंघोळ, जेवण करून बसलो, म्हणले आता तरी झाले असेल काम लवकर म्हणून कॉल केला तर अजून वेळ आहे सांगितले मामींने. तोवर २;३० पासून वाजून गेले मी ऑफिसच्या कामाला लॉगिन केले असले तरी मी घेयला येतो म्हणून आधीच सांगून ठेवले होते. ३ च्या आसपास काहीतरी त्यांना लस मिळाली असा त्यांनी मला कॉल केला आणि त्या त्यांच्या मुलासोबत त्या घरी आल्या जो की कामासाठी कालच बाहेर गेला होता तो नेमका त्यावेळी आला.
ही अशी रांग प्रत्येक गावात तुम्हाला दिसेल, तुम्हाला ही असे अनुभव आलेच असतील. हे मी घालवलेले ५ तास लसीच्या रांगेतले. यातून हे पण कळते की आपली यंत्रणा अजून खूपच मागे पडते आहे. अजून १२५ करोंड लोकांना लस मिळे पर्यन्त काय माहीत कोणते वर्ष उजाडलेले असेल. तोवर सगळ्यांनी कृपया काळजी घ्या वयस्क लोकांना जपा.
हर्षद कुंभार