शाळेतल्या काही आठवणी …
पहिली ते सहावी पर्यंतचा शालेय प्रवास असा काही फारसा ठळक आठवत नाही. पण इयत्ता ७ वी ते १० वी पर्यंतचे शालेय जीवन खूप ठळक आणि यादगार स्वरूपातले गेले. सामान्य विद्यार्थी ते वर्गातील टॉप १० या हुशार यादी येण्या पर्यंतचा प्रवास. हा काळ खूप संघर्षमय होता असे नाही पण तरीही शिस्त आणि नियमात बांधणारा मात्र होता.
माझी शाळा मा. दादासाहेब दांडेकर विदयालय, भिवंडी , ठाणे. आणि वडील गो. ग. दांडेकर मशीन वर्क्स, भिवंडी येते कामाला होते. आमची शाळा ही दांडेकरांनी सुरु केली होती, त्यामुळे दांडेकर कंपनीमधील बऱ्याच कामगारांची मुले याच शाळेत शिकायला होती. कंपनी आणि शाळेचे हे नाते असल्याने माझ्या वडिलांना शाळेतील शिक्षक बऱ्यापैकी ओळखत होते. बरं यामुळे शाळेत माझ्यावर शिक्षकांचे विशेष लक्ष होते असेही नाही.
आयुष्याला खरी कलाटणी तर तेव्हा मिळाली जेव्हा ७ वी मध्ये मला कमी मार्क मिळाले आणि त्यामुळे वडिलांचा ओरडा खायला लागला होता. माझं शिक्षणाकडे लक्ष नाही हे मूळ कारण वडिलांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी मला खाजगी शिकवणी लावायची ठरवले. घरगुती शिकवणी पासून सुरु केले खरे पण म्हणावी तितकी प्रगती दिसत नव्हती म्हणून वडिलांनी चांगल्या शिकवणी मध्ये पाठवले.
शेवटी मी थोरात सरांकडे स्तिरावलो पूर्ण ३ वर्ष. जसे चांगले शिक्षक योग्य वळण आणि मार्गदर्शन करतात त्यानुसार मी बदलत गेलो. सरांचा वैयक्तिक प्रभाव असा होता की अभ्यासाची गोडी निर्माण झाली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की ८वी मध्ये मी मराठी, हिंदी, विज्ञान, इतिहास अश्या काही विषयांमध्ये जास्त मार्क मिळवून पहिल्या ५ मध्ये पोचलो. एका वर्षातील ही प्रगती पाहून वडील सुखावले होते आणि आता मी सर आणि मॅडम यांच्या दृष्टिक्षेपात आलो होतो. त्यामुळे साहजिकच या सगळ्यांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या होत्या. ज्या ज्या विषयांमध्ये मी चांगला होतो त्या त्या शिक्षकांसोबत विशेष ओळख बनली होती.
मराठीमध्ये मी सर्वात जास्त मार्क पाडले होते तर राणे मॅडम यांचे खास लक्ष होते माझ्यावर. त्यांना अपेक्षा होती बोर्डात मी मराठीमध्ये सर्वात जास्त मार्क्स मिळवेल. कारण मी नेहमीच चांगले मार्क्स मिळवायचो.
विज्ञान शिकवणाऱ्या पाटील मॅडमची विशिष्ट पद्धत होती शिकवण्याची. त्या उद्या काय शिकवणार ते आधीच आम्हाला वाचून येयला लावत असत आणि मग दुसऱ्या दिवशी प्रथम मुलांनी मूळ मुद्दे सांगायचे आणि मग मॅडम त्याचे स्पष्टीकरण देणार. मॅडमला हे नक्की माहीत असायचे की कोणी काही बोलले नाही तरी हर्षद एकतरी पॉईंट सांगेलच म्हणून एकदा तरी माझं नाव पुकारायच्याच. त्यामुळे बऱ्याचदा मुलं वाचायची मॅडमचा मार खाण्यापासून.
इतिहास विषयाचे पवार सर. सरांची माझ्यावर खास मर्जी होती त्याच खास कारण असे होते की
सर जे काही त्या दिवशी शिकवणार असतील ते आधी मला वर्गात मोठ्या आवाजात वाचायला लावायचे आणि मग ते नंतर शिकवायचे. त्या वेळी आम्ही पौगंडावस्तेत असल्याने कोवळ्या आवाजातून पुरुषरुपी आवाजात येत होतो म्हणून आवाज मोठा आणि स्पष्ट होता. म्हणून सर मला नेहमी वाचायला लावायचे.
हिंदी चांगलं होण्या मागचे कारण खरं तर आमचे शेजारी जे उत्तर प्रदेशचे होते त्यांच्यासोबत आमचा चांगला घरोबा होता. त्यामुळे हिंदी मध्ये देखील पकड लगेच बसली आणि चांगले मार्क्स मिळत गेले. सर आणि मॅडम म्हणाल तर एखादे नेमलेले शिक्षक कधी नव्हतेच.
बाकी विषय म्हणाल तर मी भूमिती, बीजगणित मध्ये जेमतेम होतो आणि इंग्लिशमध्ये मात्र खूपच गरीब होतो अगदी छत्तीसचा आकडा म्हणा. त्याला कारण पण तसेच होते मुळात एक धड शिक्षक कधी मिळाले नाहीत आणि जे कुलकर्णी सर होते ते इंग्लिश तासाला इंग्लिश विषय सोडून बाकीचे माहितीपर विषय जास्त शिकवत होते. पण त्यांच्यामुळे वर्गाबाहेरच ज्ञान आम्हाला मिळत होते.
इतर उपक्रम म्हणाल तर माझी चित्रकला त्यावेळी छान होती. त्यामुळे कोणत्याही थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी असली की शाळेच्या फळ्यावर मला त्या व्यक्तीचे चित्र काढायला हमखास सांगायचे.
या काही आठवणी कायम लक्षात राहतील माझ्या आणि माझ्या वर्गमित्रांच्या. पुन्हा हे जेव्हापण वाचनात येईल तेव्हा आठवण्या अजून ताज्या होतील हे नक्की. - हर्षद कुंभार (३०-०७-२०१७ ११:५०)
#दांडेकरशाळा #जुन्याआठवणी #भिवंडी